पुणे; पुढारी वृत्तसेवा: क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करून 'वार्षिक शुल्क कमी करून देतो,' अशी बँकेची खोटी ऑफर सांगून एका महिलेला सायबर चोरट्याने 2 लाख 99 हजार 970 रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका 33 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2022 रोजी घडली.
फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर सायबर चोरट्याने फोन करून तो क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींचा विश्वास संपादन करून क्रेडिट कार्डचे जास्तीचे वार्षिक शुल्क कमी करून देतो, अशी बँकेची खोटी ऑफर सांगून त्यांना आपल्या जाळ्यात खेचले. त्यानंतर फिर्यादींना बोलण्यात गुंतवून क्रेडिट कार्डची सर्व गोपनीय माहिती आपल्याकडे घेतली. पुढे त्याच गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या कार्डमधून परस्पर 2 लाख 99 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.