पुणे

पुणे : फाटा क्र. 22 ला पहिले आवर्तन

अमृता चौगुले

माळेगाव : पुढारी वृत्तसेवा : माळेगाव परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच निरा डाव्या कालव्यावरील फाटा क्र. 22 ला खरीप हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांना उसाच्या लागवडी व पिकाच्या पेरण्या करता येणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक, येळेगाव, गोफणेवस्ती, वाघमोडे वस्ती, माळेगाव खुर्द, पाहुणेवाडी, शिरवली खांडज या बागायती पट्ट्यात अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बहुतांशी शेतकर्‍यांनी आपल्या शेताच्या मशागती करून ते पेरण्याकरिता पावसाची वाट पाहत होते.

मुख्यतः उसाच्या लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता भासू लागली होती. अशा स्थितीमध्ये निरा डाव्या कालव्यातून फाटा क्र. 22 ला पूर्ण क्षमतेने आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उसाच्या लागवडी करण्यासाठी तसेच उभ्या असलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली. दरम्यान माळेगाव येथील फाटा क्र. 22 वर सुमारे 1 हजार 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असून बहुतांश शेतकरी प्रवाह पद्धतीने पाणी घेऊन शेती पिकवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

SCROLL FOR NEXT