पुणे

पुणे : फसवणूक संदर्भात मंजिरी मराठे यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठे ज्वेलर्सच्या विविध योजनांद्वारे चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील मंजिरी कौस्तुभ मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी मंजिरी मराठे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज करण्यात आला.

त्यास सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी विरोध केला. आरोपीचा प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा. लि. या मुख्य शाखेच्या कामकाजात सहभाग होता. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना अटक करणे आवश्यक असल्याचा अ‍ॅड. वाडेकर यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.

या गुन्ह्यात मराठे ज्वेलर्स-प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा. लि. यांनी कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या किमतीवर 60 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. आरोपींनी या बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यामुळे बँकेने त्यांना वसुलीची नोटीस पाठवली होती.

याप्रकरणी मृत मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे (वय 54), मंजिरी कौस्तुभ मराठे (वय 48), नीना मिलिंद मराठे आणि प्रणव मिलिंद मराठे (वय 26, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे) इतरांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे (वय 59, रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील शाखांमध्ये 14 जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपींनी ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी आदी गुंतवणूक करायला लावली, तसेच फिर्यादींसह अनेक गुंतवणूकदारांची 4 कोटी 33 लाख 2 हजार 970 रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले आहे.

SCROLL FOR NEXT