पुणे; पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणार्या नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सोमवारी (दि. 1) सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. विविध बाबींची अंमलबजावणी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एम फुक्टो) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पुक्टो) यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
71 दिवसांच्या पगाराचा परतावा, विद्यापीठ अनुदान आयोगाची समग्र योजना लागू करणे, अर्धवेळ प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करणे, रिक्त पदांची भरती करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. सहसंचालकांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. एल. गिरमकर म्हणाले, 'महाराष्ट्र प्राध्यापक कार्यकारी मंडळाच्या ठरावानुसार प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून सहसंचालक कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करीत असून, शासनाने आमच्या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी.'
प्राध्यापकभरतीचा प्रश्न ऐरणीवर
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणानुसार प्राध्यापकांची सर्व पदे भरणे आवश्यक आहे. राज्यात मात्र प्राध्यापकांची 60 टक्क्यांहून अधिक पदे अजूनही रिक्त आहेत. एकप्रकारे राज्य सरकारने 'यूजीसी'चे नियम धाब्यावर बसविले असून, प्राध्यापकभरती तातडीने करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्राध्यापकभरतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.