पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या बदल्यांचे वारे वाहत आहे, त्यामुळे या बदली प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी तालुकास्तरावरच त्रिसदस्यीय समिती स्थापन करावी आणि या समितीमार्फतच शिक्षकांच्या प्रस्तावांची छाननी केली जावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यांना दिल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या ऑनलाइन पध्दतीने करण्याबाबत सॉप्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित ऑनलाइन प्रक्रियेत जिल्हाअंतर्गत बदली होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या शिक्षकांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांच्या प्रस्तावांची तसेच कागदपत्रांची छाननी करण्यासाठी तालुकास्तरावर तालुकानिहाय त्रिस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यात त्रिस्तरीय समिती तयार करून त्यानुसार संबंधित सदस्य अध्यक्षांना कळविण्यात यावे, असे सूचित करण्यात आले आहे.