नायगाव : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यामध्ये काही भागांत मुसळधार, तर काही भागांत अद्याप पाऊसच झालेला नाही. शेतकरी सध्या संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. जोपर्यंत 80 ते 100 मिमी पाऊस पडत नाही, तोवर पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला माेठा निर्णय : मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप
तालुक्यामध्ये सद्य:स्थितीला सर्वसाधारण 112 मिमी पावसाची अपेक्षा होती. परंतु, अद्याप 23 जूनपर्यंत तालुक्यामध्ये 41.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जवळपास 37 टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे. त्यामुळे अजून पावसाची अपेक्षा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. पूर्व भागात सीताफळ, अंजीर आणि डाळिंब या पिकांना पाण्याची कमतरता भासण्याचे चित्र आहे.
तालुक्यात पेरणीयुक्त पाऊस न झाल्याने बहुतांश भागांत भुईमूग, वाटाणा यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. तसेच, काही शेतकर्यांनी जूनच्या सुरुवातीला बाजरीची पेरणी केली होती. त्याची उगवण झालेली नाही. यामुळे पुरंदरमध्ये काही भागांत दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
मागील हंगामामध्ये अधिक उष्णतेमुळे फुलधारणा होऊन फळधारणा झालेले नाही. अधिक उष्णतेमुळे फूल गळून तालुक्यातील सर्वांत सीताफळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे काही शेतकर्यांनी सध्या सीताफळाच्या पिकाची दुबार छाटणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यामध्ये दिवे व सोनोरी परिसरामध्ये सध्या अंजिराचा मोठा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, शेतकरी खट्ट्या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. त्यामध्ये झाडे विशिष्ट प्रकारे वळवून त्याला आकार दिला जातो. मग आळी करून त्याला खत घातले जाते. पाणी देऊन खट्ट्या हंगामाला सुरुवात होते.