पुणे

पुणे : पीएमपीचा चर्‍होलीला ई-डेपो प्राथमिक काम सुरू; लवकरच होणार कार्यान्वित

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीकडून ई-डेपो उभारण्याचे काम सुरू असून, आता पीएमपी पुण्यातील चर्‍होली येथे नवा सातवा ई-डेपो उभारत आहे. पीएमपीकडून आता पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविण्याचे नियोजन सुरू आहे. त्याच धर्तीवर या डेपोंची संख्या वाढवण्यात येणार आहे. या डेपोचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच या डेपोतून ई-बसगाड्यांची सेवा पुणेकरांना मिळेल.

पीएमपीने फेम 2 योजनेअंतर्गत सुरुवातीला ई-बस खरेदी केल्या. त्यांची देखभाल दुरुस्ती, पार्किंग आणि चार्जिंग सुविधेसाठी पहिल्यांदा पीएमपीने भक्ती-शक्ती चौक आणि भेकराईनगर या दोन ठिकाणी ईलेक्ट्रिक डेपो उभारला. त्यानंतर ताफ्यातील ई-गाड्या जसजशा वाढू लागल्या तसतसे पीएमपीने ई-डेपोंची संख्यादेखील वाढविली. ही संख्या दोन ई-डेपोंवरून आता सात होत आहे, त्यामुळे आगामी काळात पीएमपीची सर्व वाहतूक ईलेक्ट्रिक बसव्दारे आणि डेपोदेखील ईलेक्ट्रिक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

निगडीत आणखी एक ई-डेपो होणार
सुरुवातीला पीएमपीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात ई-डेपो सुरू केला होता. आता पीएमपी निगडीतच नवा ई-डेपो सुरू करणार आहे, त्यामुळे निगडीमध्ये पीएमपीचे 2 नवे ई-डेपो असतील.

पीएमपीकडून आता सातवा नवा ई-डेपो चर्‍होली येथे उभारण्यात येत आहे. त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून 70 ई-बस चालविण्याचे आमचे नियोजन आहे. लवकरच हा डेपो प्रवाशांच्या सेवेत असेल.

                       – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.

डेपोेनुसार अशा आहेत ई-बस
अ.
क्र. डेपोचे नाव ई-बसची संख्या
1) भेकराईनगर 106
2) भक्ती-शक्ती (निगडी) 70
3) बाणेर 70
4) वाघोली 49
5) पुणे स्टेशन 90
6) निगडी 112
7) चर्‍होली 70

SCROLL FOR NEXT