पुणे

पुणे : पिंगोरीत वाहनासमोर बिबट्याचा ठिय्या

अमृता चौगुले

वाल्हे, पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील पिंगोरीच्या डोंगर खोर्‍यात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. सोमवारी (दि. 1) सायंकाळी सरपंच जीवन शिंदे पिंगोरीकडे जात असताना कवाडेवाडीजवळ त्यांच्या वाहनासमोरच बिबट्याने ठिय्या मांडला.

पिंगोरी परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्या असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात त्याचे पुरावे मिळत नव्हते. सोमवारी सरपंच शिंदे यांनी त्याला मोबाईलमध्ये कैद केले. त्यामुळे बिबट्याचे अस्तित्व अधोरेखित झाले.

सरपंच शिंदे यांनी वन अधिकार्‍यांशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्याची मागणी केली. याबाबत सासवड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नागरिकांनी घाबरून न जाता आपली व जनावरांची काळजी घ्यावी. वन कर्मचारी त्या परिसरास भेट देणार आहेत. तसेच जर बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्यास वनविभागाच्या 1926 या क्रमांकावर अथवा वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा वनकर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.'लोकांनी एकट्याने फिरू नये; बिबट्याला हुसकावू नये; रात्री – अपरात्री बाहेर पडू नका, असे आवाहन पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT