पुणे

पुणे : पावसाळ्यातही देवदर्शन जोरात; धार्मिक स्थळांना भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर आता पुण्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळाली आहे. पावसाळ्याचा सीझन असला, तरी परराज्यांतून येणारे पर्यटक धार्मिक स्थळांना भेट देत आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यातही धार्मिक स्थळांना भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. सध्या परराज्यांतून अनेक पर्यटक धार्मिक स्थळांमध्ये येत असून, संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंदिरांपासून ते मशिदीपर्यंत, गुरुद्वारापासून ते चर्चपर्यंत, सर्व ठिकाणी पर्यटक आवर्जून भेट देताना दिसत आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, 'धार्मिक स्थळांना भेट देणे हा भारतीय लोकांच्या धार्मिकतेचा भाग आहे. या धार्मिक पर्यटनावर अनेक छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. सध्या प्रत्येकाचे आर्थिक गणित रुळावर आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला दिवसभरात अनेक पर्यटक भेट देत आहेत. अनेक पर्यटक पुण्यात येत असून, त्याचा फायदा पर्यटन व्यवसायाला होत आहे.' गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे (कॅम्प) अध्यक्ष चरणजितसिंग सहाणी म्हणाले, 'गुरुद्वारामध्येही हजारो लोक भेट देतात आणि देणगी देतात. आता त्याचे प्रमाण वाढले आहे. धार्मिक स्थळांशी लोकांचा एक भावनिक बंध असतो. एक वेगळेच चैतन्य आणि ऊर्जा धार्मिक स्थळांना भेट देऊन त्यांच्यात संचारते.'

देणग्या, धनादेशाचे प्रमाणही वाढले
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, श्री ओंकारेश्वर मंदिर, पाताळेश्वर लेणी, चतु:शृंगी मंदिर, श्री कसबा गणपती मंदिर आदी मंदिरांना पर्यटक भेट देत आहेत. त्याशिवाय इतरही धार्मिक स्थळांना पर्यटक भेट देत असून, सध्याला धार्मिक स्थळांच्या देणग्या, धनादेशाचे प्रमाणही वाढले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT