पुणे : पुढारी वृत्तसेवा : संततधारेचा फटका पालेभाज्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. बाजारात दर्जेदार पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याने पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव चाळिशीवर पोहोचले असून, सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सासवड परिसर, हडपसर, उरुळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथून शहरात पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात संततधार सुरू आहे. त्यामुळे, पावसाचा मार बसलेल्या पालेभाज्या बाजारात दाखल होत आहेत. ज्याठिकाणी पाऊस कमी झाला आहे, तेथून दर्जेदार पालेभाज्यांची आवक होत आहे.
मात्र, हे प्रमाण अवघे तीस टक्केच आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने पावसाने भिजलेल्या पालेभाज्या दहा ते पंधरा रुपये तर दर्जेदार पालेभाज्या तीस ते चाळीस रुपयांना मिळत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात दररोज सरासरी कोथिंबिरीची 90 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक होत आहे.
मागील आठवड्यात पाऊस सुरू होण्यापूर्वी कोथिंबिरीची आवक दीड लाख, तर मेथीची आवक 50 हजार जुडी इतकी होत होती. पावसामुळे, कोथिंबिरीची आवक साठ हजार जुड्यांनी घटून 90 हजारांवर आली आहे, तर मेथीसह अन्य पालेभाज्यांची आवक कायम आहे. मात्र, यामध्ये दर्जाहीन पालेभाज्यांचे प्रमाण जास्त आहे.