नानगाव, राजेंद्र खोमणे : पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथे गेली काही वर्षांपासून चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. परिसरातील वेगवेगळ्या भागात सध्या छोट्या, मोठ्या चोर्या होत आहेत. यामुळे नागरिकांंची डोकेदुखी वाढली आहे. परिसरात सुरू असलेले चोर्यांचे सत्र थांबणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. हे गाव शिरूर-सातारा व वाघोली-दौंड या मार्गावर असून, गावात मोठी बाजारपेठ आहे. या भागात दिवसेंदिवस नागरीकरण वाढत चाललेले आहे. यामुळे या गावात सतत परिसरातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. रात्रंदिवस वाहतूक सुरू असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे नागरिक येथे येत-जात असतात. तसेच गावात मोठ्या प्रमाणावर बाहेरगावाहून कामानिमित्त आलेले नागरिक, परप्रांतीय गु-हाळवाले व इतर कुटुंबदेखील गावात वास्तव्यासाठी आहेत.
मुख्य चौकात मोठ्या प्रमाणावर व्यापारी गाळे व मोठमोठी व्यावसायिक दुकाने आहेत. तसेच भीमा नदीकाठाच्या भागात विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे नागरिकांकडे सोनेनाने व दररोजच्या खर्चासाठी थोडीफार रोकड रक्कम असते. त्यामुळे अनेकदा झालेल्या चोर्यांमध्ये सोन्याचे दागिने, रोकड, विद्युत मोटारी व काही दुकानांतील साहित्य चोरीस गेल्याच्या घटना गेल्या काळात घडलेल्या आहेत.
चोर्या करून चोरट्यांना पसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उसाची शेती, प्रमुख रस्ते आहेत. तसेच भीमा नदीच्या पलीकडे शिरूर तालुका आहे. त्यामुळे तालुक्यातील पोलिसांचीदेखील हद्द् ठिकाणी संपते. गावापासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर पोलिस ठाणे असून गावात ग्राम सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाचे कामदेखील सुरू नाही. या गोष्टींमुळेदेखील चोर्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे ग्रामपंचायत व पोलिसांच्या माध्यमातून गावात युवकांना बरोबर घेऊन ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करावी. तसेच गावात रात्रीच्या वेळी गस्ती सुरू केल्यास चोर्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिवसेंदिवस वाढणार्या चोर्या व्यावसायिक व नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. या वाढणार्या चोर्या रोखण्याचे पोलिस यंत्रणेसमोर सध्या मोठे आवाहन निर्माण झाले आहे. मात्र, चोर्यांचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास भविष्यात चोरांकडून नागरिकांच्या जिवालादेखील धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वाढत्या चोर्या रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.