पुणे

पुणे : पाण्यातील जिवाणूंचे प्रमाण दीडशेपटीने वाढले; 15 वर्षांत वेगाने वाढ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या परिसरात वाढलेले नागरीकरण आणि जलप्रदूषणामुळे गेल्या 15 वर्षांत पाण्यातील जिवाणूंचे (बॅक्टेरिया) प्रमाण तब्बल दीडशेपटीने वाढले आहे. त्यामुळे सर्वाधिक शुद्ध पाणीपुरवठा होणारे शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या पुण्याच्या पाण्याला भविष्यात अशुद्धतेचे ग्रहण लागण्याची आणि पाण्यापासून पसरणार्‍या साथीच्या रोगांचा धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो. आजमितीला या धरणातून दर वर्षी 19 टीएमसी पाणी महापालिका घेते.

या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रांत प्रक्रिया करून सर्वोच्च शास्त्रीय पद्धतीने शुद्धीकरण केलेले पाणी पुणेकरांना वितरित केले जाते. यामुळेच पुणे शहरामध्ये पिण्याच्या पाण्यातून साथीचे रोग पसरण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये धरणातून उचलण्यात येणार्‍या पाण्यातील कॉलिफॉर्म आणि ई कोलाय या बॅक्टेरियाचे (जिवाणूंचे) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बॅक्टेरियाचे हे प्रमाण 15 वर्षांपूर्वी साधारण प्रति 100 मिली लिटरमध्ये 800 ते 900 इतके होते. हे प्रमाण आजच्या घडीला दीड लाखांच्या पुढे गेले आहे.

यामध्येही टेमघर धरणातून उचलण्यात येणार्‍या पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक आहे. तर, खडकवासला, पानशेत व वरसगाव धरणातील बॅक्टेरियाचे प्रमाणही वाढत आहे. साठून राहिलेले पाणी, मैलामिश्रित पाण्यामध्ये हे बॅक्टेरिया अधिक वेगाने वाढतात. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस, हॉटेल्स आणि घरांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातील नागरीकरण वाढत आहे.

ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी वापरण्यात येणारे पाणी ओढे, नाल्यांमध्ये सोडण्यात येते. तेथून ते धरणामध्ये येते. धरणांमध्ये येणारे मैलापाणी रोखण्यासाठी प्रशासनाने व सरकारने अत्यावश्यक पावले उचलण्याची गरजही या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. परंतु, जल शुद्धीकरणातील प्रक्रियेमध्ये क्लोरिन आणि अन्य रासायनिक प्रक्रियांचा वापर करून बॅक्टेरियामुक्त पाण्याचा पुरवठा महापालिकेकडून केला जातो.

नागरिकांनी घ्यावी काळजी…
कॉलिफॉर्म आणि ई-कोलाय या बॅक्टेरियामुळे काविळीसारखे साथीचे रोग पसरण्याचा धोका असतो. यापैकी प्रामुख्याने ई-कोलाय या बॅक्टेरियामुळे कावीळ, डायरियासारखे आजार होतात. साठलेल्या आणि उघड्यावरील पाण्यामध्ये या बॅक्टेरियाची वाढ वेगाने होते. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळ उघड्यावर साठवून ठेवलेले पाणी पिण्यासाठी वापरताना योग्य ती काळजी घ्यावी.

सोसायट्यांमधील व इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर आवर्जून स्वच्छता करून घ्यावी. महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणारे पाणी हे पूर्णत: प्रक्रिया करून निर्जंतूक करण्यात आलेले असते. परंतु, या पाण्यामध्ये पाइपलाइन लीकेज होऊन कुठे भेसळ होत असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने दुरुस्ती करून केली जाते. तसेच, शहरातील विविध भागांतील महापालिकेकडून वितरित होणारे पाणी प्रयोगशाळेत आणून वारंवार त्याची तपासणी केली जाते.

                    – मंदार सरदेशपांडे, सीनिअर केमिस्ट, महापालिका प्रयोगशाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT