पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 जुलै रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) या परीक्षेची इयत्तानिहाय तसेच पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल. ऑनलाईन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्यासाठी 18 ते 28 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी तसेच आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरीत्या उत्तर पाठविले जाणार नाही. मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत, असे असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी स्पष्ट केले आहे.