पुणे

पुणे : पाऊस गेला कुणीकडे? पेरण्या खोळंबल्या चोहीकडे

अमृता चौगुले

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील ओतूर व माळशेज पट्ट्यात ओतूर, उदापूर, बनकरफाटा, डिंगोरे, नेतवड, मांदारणे या गावांमध्ये शुक्रवारी (दि. 24) वरुणराजाने अल्प प्रमाणात हजेरी लावली. मात्र, या पावसाने जमिनीवरील ढेकळेही फुटली नाहीत. पेरणीयोग्य ओल नसल्यामुळे 'गेला पाऊस कुणीकडे? पेरण्या खोळंबल्या चोहीकडे' असे म्हणण्यासारखी अवस्था झाली आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर पुरेशा प्रमाणात पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकर्‍यांनी कशीबशी मशागत करून जमीन पेरणीयोग्य केली आहे. बियाणे खरेदी करून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, आकाशात दररोज ढग जमा होतात व गायब होतात. गेल्या 25 दिवसांपासून हा लपंडाव सुरू असल्याने या परिसरात सर्वच पेरण्या खोळंबल्या आहेत. पुरेशा पावसाअभावी विहिरी, कूपनलिका, तळी यांच्या पाणीपातळीत तसूभरही वाढ झालेली नाही. ओढे, नाले कोरडेठाक पडले आहेत. परिणामी, शेतकर्‍यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे.

जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात दरवर्षी पावसाचे आगमन होत असते, परंतु यंदा पाऊस वारंवार हुलकावणी देत आहे. वेळेत पेरणी झाली, तर पुढच्या पिकांनादेखील फायदा होऊ शकतो. उदापूर परिसरात काही निवडक शेतकर्‍यांनी थोड्याशा पावसावर पेरणी केली आहे. मात्र, आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. माळशेज पट्ट्यातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, ठिकेकरवाडी, डुंबरवाडी, खामुंडी या परिसरातही पावसाची प्रतीक्षा आहे. अतिदुर्गम भाग कोपरे, मांडवे, जांभूळशी या परिसरातही पावसाचे अतिअल्प प्रमाण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. आजही त्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मशागतीची कामेही खोळंबली आहेत. परिणामी, पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत.

उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर कामाची वेळ

शेतकर्‍यांना उदरनिर्वाहासाठी शेजारच्या गावात जाऊन रोजंदारीवर कामे करावी लागत आहेत. या भागात पाऊस झाल्यास कमीत कमी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न मार्गी लागेल, असे मांडवे येथील पोलीस पाटील बबन दाभाडे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT