पुणे

पुणे : पर्यटनाला जाताय? नियम विसरू नका; जिल्हा प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पर्यटनस्थळांवर सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन जीव गमावल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या घटना पावसाळ्यात वारंवार घडतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटनस्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची दरवर्षी गर्दी होते.

या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल आणि त्या ठिकाणी पाऊस, दाट धुके असेल तर स्थानिक गावातील एखादा मार्गदर्शक सोबत न्यावा. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने दाट धुके असल्यास गाडीचे दिवे आणि पार्किंग दिवे चालू ठेवून गाडी चालवावी. पर्यटनस्थळी सुरक्षारक्षक भिंती, लोखंडी कडे नसल्याने धबधब्याच्या प्रवाहात उतरू नये, सर्व पर्यटकांनी सायंकाळी चार वाजण्यापूर्वी परतीच्या प्रवासाला लागावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते अरुंद असल्याने आपली वाहने रस्त्यावर लावू नयेत.

रस्त्यावर अचानकपणे चिखल होणे, दरड कोसळणे, रस्ता निसरडा होणे हे प्रकार होऊ शकतात, त्या दृष्टीने वाहने चालवावीत. जे वाहनचालक या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे ग्रामीण पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नियम मोडणार्‍यांवर होणार कारवाई
नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाईदेखील करण्यात येणार आहे. पूर्वमोसमी पाऊस आणि जून महिन्यात पाठ फिरवल्यानंतर दीर्घ कालावधीनंतर मोसमी पावसाने शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सीमाभिंत कोसळून नागरिक जखमी किंवा मृत्युमुखी पडण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील धोकादायक ठिकाणे शोधून तेथे कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT