पुणे

पुणे : पन्नास टक्के शिक्षकांची पदे भरणार; शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'राज्यातील काही शाळांमध्ये दोन विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत आहे, तर काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यातून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन, रिक्त पदांच्या 50 टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येईल,' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शालेय शिक्षण विभागाची बुधवारी (दि.7) आढावा बैठक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंडळात झाली.

या बैठकीत केसरकर यांनी शिक्षण विभागातील विविध विभागांचा आढावा घेतला. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, की शिक्षक भरतीसोबतच शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदे भरण्यात येणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याला प्राधान्य देण्यात येईल. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे रिक्त पदांच्या 50 टक्के पदे भरण्याला अचडण नाही. त्यामुळे ही पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. शिक्षकांचे वर्गात छायाचित्र लावण्याऐवजी शाळेतील परिचय फलकावर शिक्षकांचे छोट्या आकाराचे छायाचित्र लावण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, पुढील वर्षीपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची जोड देण्यात येणार आहे, असा पुनरुच्चार शिक्षणमंत्री केसरकर यांनी केला.

एका इयत्तेला तीन पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये धडा संपला की, काही कोरी पाने देण्यात येईल. विद्यार्थ्यांना या पानांचा उपयोग वहीसारखा करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेगळ्या वह्या आणण्याची गरज भासणार नाही. पुढील शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.

गुणवत्ता वाढीसारख्या चांगल्या सुधारणा दिसणार
'आगामी काळात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासोबतच, शालेय शिक्षणात कौशल्य विकासावर भर देण्यासाठी काम करणार आहे. येत्या काही दिवसांत शालेय शिक्षण विभागात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसारख्या चांगल्या सुधारणा दिसतील,' असे केसरकर यांनी सांगितले.

दसरा मेळावा घेण्यावर ठाम
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. बाळासाहेबांच्या प्रथा-परंपरा कायम ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे आणि दसरा मेळावा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे दसरा मेळावा घेण्यावर शिंदे गट ठाम आहे,' असे मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT