पुणे; पुढारी वृत्तसेवा: पूर्वीच्या प्रेयसीला व तिच्या पतीला वारंवार कॉल करून, तसेच प्रेयसीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मांजरी येथील 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अहमदनगर- नेवासा येथील 25 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणाने फिर्यादी तरुणीला तू तुझ्या पतीला घटस्फोट दे, घरातून हाकलून दे नाही तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेईन. या गोष्टीला तुम्ही दोघे जबाबदार असाल, असा मेसेज पाठवून धमकीही दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण व तरुणी हे दोघे सॉफ्टवेअर अभ्यासक्रमाच्या क्लाससाठी एकत्र होते. तेथे मैत्रीतून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, तरुणाचे दुसर्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्यामुळे तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडून त्याचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर तरुणीचे लग्न झाले. त्यानंतरदेखील तरुणाने तरुणीच्या पतीला व तिला फोन करून पाठलाग केला. तसेच तरुणीचे पती व बहिणीच्या इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज व फोटो पाठवले.तसेच धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्रासाला कंटाळून तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक थोरात करीत आहेत.