पुणे, पुढारी वृत्तसेवा: बँकेतील नोकरीच्या आमिषाने महिलेला 8 लाख 40 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 33 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी महिला या नोकरीच्या शोधात होत्या. त्याचाच फायदा घेत दोन अज्ञात महिलांनी त्यांना फोनवर संपर्क साधला. त्यामध्ये श्वेता आणि रिधिमा असे नाव सांगत आरोपींनी फोनवरून फिर्यादी यांना अॅक्सिस बँकेत नोकरी लावून देतो असे सांगितले.
यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन, रिफंड प्रोसेस, जॉईनिंग लेटर, सॅलरी डिपॉझिटी, बँक अँग्रीमेट यासाठी गुगल पे किंवा खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनीही मोठ्या बँकेत नोकरी लागते म्हणून 8 लाख 40 हजार रुपये आरोपींच्या हवाली केले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुढील पैसे भरण्यास नकार दिला. तर आरोपींना फिर्यादीला फोन करून पैसे भरले नाही, तर बरबाद करून टाकू' अशी धमकी दिली. त्यामुळे महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय खोमणे हे करीत आहेत.