बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील बसस्थानकात एक गरोदर महिला तिच्या चार लहान मुलांसह अत्यंत भेदरलेल्या स्थितीत होती. बारामतीतील काही पत्रकारांनी तिची अवस्था पाहून शहर पोलिसांना मदतीचे आवाहन केले. पोलिसांनी तत्परतेने तिची भेट घेतली असता, ती निराश्रित असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तिची मुलांसह येथील प्रेरणा शासकीय महिला वसतिगृहात रवानगी केली.
या महिलेजवळ सहा वर्षांखालील तिची चार मुले होती. शिवाय, ती स्वतः गरोदर अवस्थेत होती. बसस्थानक परिसरात तिच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. दोन पुरुष तिच्या मुलांना अन्य दोघांकडे घेऊन जाण्याच्या बेतात होते. त्यामुळे पोलिसांनी लागलीच त्या महिलेसह तिच्या मुलांना शहर पोलिस ठाण्यात आणले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, पतीसोबत पटत नसल्याने ती काही महिन्यांपूर्वी घर सोडून बारामतीत आली होती.
एका व्यक्तीसोबत ती बारामतीत पुलाखाली रस्त्याच्या कडेला राहत होती. दिवसभर भीक मागून मुलांना जगवत होती. ज्या व्यक्तीसोबत ती बारामतीत राहिली, त्याच्याकडूनच तिला दिवस गेले. त्यामुळे तिच्या पहिल्या पतीला ही बाब समजल्यावर तो बारामतीत आला. त्याने संबंधित व्यक्तीला मारहाण केली. ते दोघेही दारुच्या नशेत तर्र होते. परिणामी, त्यांच्यापासून मुलांच्या जिवाला धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्याने पोलिसांनी तत्काळ तिची मुलांसह प्रेरणा वसतिगृहात रवानगी केली. तिच्या मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करीत त्यांना सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.