भोर : पुढारी वृत्तसेवा : रिंग रोडवरील रस्त्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याबरोबर राडा- रोडाही वाहून आला होता. रस्त्यावरील मोर्या तुंबल्या असून, त्यातील राडारोडा काढून त्या स्वच्छ केल्या आहेत. भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाअभियंता संजय वागज यांनी केले.
निरा देवघर धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने ओढे – नाल्यात पाणीपातळी वाढली आहे. यामुळे रिंग रोडवरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर राडारोडा वाहून येत मोर्या तुंबल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधिकारी योगेश मेटेकर, कर्मचारी प्रभाकर जाधवर यांनी रस्त्याची पाहणी करून मोर्यांमधील अडकलेला पाला-पाचोळा, दगडी गोटे, झाडाची खोडे बाजूला करून स्वच्छ केले. रिंगरोड वरील काही कामे अर्धवट राहिली असून रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहामुळे चर गेले आहेत. येत्या दोन दिवसांत हे चर बुजविले जातील, असेही योगेश मेटेकर यांनी सांगितले.
रिंग रोडवरील अभेपुरी, चौधरीवाडी, दुर्गाडी, मानटवस्ती, कुंडली बुद्रुक, कुडली खुर्द, शिरवली हिमा, माझेरी, गुढे, निवंगण, पर्हर खुर्द, पर्हर बुद्रुक, कंकवाडी – दापकेघर या गावातील ग्रामस्थांनी प्रवास करताना सतर्क राहण्याची सूचनाही मेटकर यांनी दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष मंत्रालय मुंबई यांचे कडून मिळालेल्या हवामान सूचनेनुसार 5 जुलै, 6 जुलै, 7 जुलै व 8 जुलै या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्याच्या घाट (डोंगर भागामध्ये) तीव्र स्वरूपाच्या पावसाचा जोरदार (Heavy RainFall) इशारा देण्यात आलेला आहे. तरी भोर तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
– सचिन पाटील, भोर तहसीलदार