पुणे

पुणे : निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध

अमृता चौगुले

शिवनगर : प्रा. अनिल धुमाळ : बारामती तालुक्यातील पणदरे गावातून गेलेल्या निरा डावा कालव्याच्या दुरुस्तीसह काँक्रिटीकरण आणि अस्तरीकरण करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामास परिसरातील शेतकरी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहेत. तथापि कालव्याच्या दुरुस्तीसह अस्तरीकरणामुळे फ्रिक्शन कमी होऊन पाण्याचा वेग वाढून आउटलेट जास्त मिळेल. त्यामुळे सर्वांना पाणी योग्य प्रमाणात मिळाल्याने शेतकरी बांधवांना याचा निश्चित फायदा होईल अशी शासकीय भूमिका आहे.

पणदरे गावातून निरा डावा कालवा वाहतो. या कालव्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर बागायती शेती आहे. या कालव्यामुळे शेतकरी ऊस शेतीसह वेगवेगळी पिके घेत आहेत. मात्र पणदरे गावातून जाणार्‍या या डाव्या कालव्यावर पवईमाळ ते पणदरे आणि माळेगाव यादरम्यान टप्प्याटप्प्याने कालव्याच्या दोन्ही बाजूचे आणि तळातील अस्तरीकरण करण्याच्या कामाच्या प्रक्रियेला गती आली आहे. यामध्ये संबंधित कामाच्या निविदा निघाल्या असून, कोणत्याही क्षणी वर्कऑर्डर निघून कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशावेळी परिसरातील शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अस्तरीकरणाने पाणी टंचाई वाढण्याची भीती

शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार कालव्याच्या दोन्ही बाजूला आवश्यकतेनुसार काँक्रिटीकरण करणे तथा अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. तथापि कालव्याच्या तळामध्ये विशिष्ट प्रकारचा कागद टाकून अस्तरीकरण केल्यास कालव्यामधून होणारे परकोलेशन (पाणी जमिनीत मुरणे) थांबेल. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होऊन शेतकरी बांधवांवर पाण्याचे संकट ओढवेल. याचा परिणाम परिसरातील शेकडो एकर बागायती जमिनीचे नुकसान होऊन जिरायतीमध्ये रूपांतर होईल. तसेच पाणी टंचाईमुळे शेतकरी उद्ध्वस्त होऊन देशोधडीला लागेल. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी एकत्र येत विरोध करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

या कामामुळे कालव्यातील पाण्याची क्षमता वाढेल. जेणेकरून सर्व शेतकरी बंधूंना योग्य प्रमाणात पाणी मिळून फायदा होणार आहे. याबाबत काही शंका असेल तर संबंधित विभागाकडील अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

                   – राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे निरा डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला आमचा विरोध नाही. तथापि कालव्याच्या तळातील अस्तरीकरणास आमचा विरोध आहे. ज्यामुळे पाण्याचे परक्युलेशन थांबून तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे नुकसान होऊन हजारो एकर बागायती क्षेत्र जिरायती होईल.

                                             – विक्रम कोकरे, सामाजिक कार्यकर्ते

निरा डावा कालवा ब्रिटिशकालीन असून पूर्वीप्रमाणे या कालव्याचे दगडी पिचिंग केल्यास पाणी गळती थांबेल. तथापि तळातील अस्तरीकरणामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांचे पाणी कमी होऊन पाणीटंचाई निर्माण होईल. शासनाने याबाबत जनमताच्या विरोधात निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.

                              – विनोद जगताप, सचिव, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड

SCROLL FOR NEXT