पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात 1 जानेवारी ते 27 ऑगस्ट या कालावधीत डेंग्यूच्या 254 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील 16 प्रभागांपैकी केवळ 4 प्रभागांमध्ये डेंग्यूच्या जवळपास निम्म्या रुग्णांचे म्हणजे 127 जणांचे निदान झाले आहे. प्रभागातील लोकसंख्या, पाणी साचण्याची ठिकाणे यांचा अभ्यास करून महापालिकेने या प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने नियोजनास सुरुवात केली आहे.
हडपसर-मुंढवा, नगर रोड- वडगावशेरी, औंध-बाणेर आणि टिळकरोड-सिंहगडरोड या प्रभागांमध्ये डेंग्यूच्या 254 रुग्णांपैकी 127 रुग्ण आढळून आले आहेत. हडपसर-मुंढवा येथे सर्वाधिक (34), त्यानंतर नगर रस्ता- वडगावशेरी (33), औंध-बाणेर (32) आणि टिळक रोड-सिंहगड रोड (28) आहेत. सर्वात कमी रुग्ण ढोले पाटील रस्ता, वानवडी-रामटेकडी आणि भवानी पेठ प्रभागांत प्रत्येकी 8, तर केशवनगर (4) आणि कोंढवा-येवलेवाडी (2) येथे नोंदवली गेली आहेत.
डासांची उत्पत्ती वाढली
जास्त रुग्ण आढळलेले प्रभाग शहरातील सर्वात मोठ्या वॉर्डांपैकी एक आहेत आणि या भागात अनेक ठिकाणी पाणी साचण्याची ठिकाणे आणि कचराकुंड्यांमुळे शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. जानेवारी 2022 ते 20 ऑगस्ट 2022 पर्यंत शहरात डेंग्यूचे 2153 संशयित रुग्ण आढळले आहेत. पीएमसीचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, 'सध्या रुग्णांची संख्या काहीशी स्थिरावली आहे. पाऊस ओसरताच रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. नागरिकांनी त्यांच्या शेजारी डासांची उत्पत्ती होणा-या ठिकाणांवर लक्ष ठेवावे आणि घरातही पाणी साठू देऊ नये.'
कोणत्या प्रभागांमध्ये डेंग्यूचे किती रुग्ण?
हडपसर-मुंढवा 34
औंध-बाणेर 32
नगर रस्ता-वडगावशेरी 33
कोंढवा-येवलेवाडी 2
वानवडी-रामटेकडी 8
धनकवडी-सहकारनगर 14
टिळक रोड-सिंहगड रस्ता 28
वारजे-कर्वेनगर 16
बिबवेवाडी 12
येरवडा-धानोरी-कळस 10
ढोले पाटील रोड 8
शिवाजीनगर-घोले रोड 10
कोथरूड 21
भवानी पेठ 8
कसबा-विश्रामबागवाडा 14
केशवनगर 4
एकूण 254