पुणे

पुणे : नव्या ‘पदवी’चे प्रारूप तयार, मिझोराम विद्यापीठाच्या चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचे मॉडेल ठरणार मार्गदर्शक

अमृता चौगुले

गणेश खळदकर : 
पुणे : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मिझोराम विद्यापीठाने चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम; तसेच दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम कसा असेल, याचे एक प्रारूप तयार केले आहे. त्यानुसार, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही वर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची आणि बाहेर पडण्याचीही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रारूप देशातील अनेक विद्यापीठांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला पहिल्या वर्षी बाहेर पडायचे असेल, तर त्याला अंडर ग्रॅज्युएट प्रमाणपत्र दिले जाईल, दुसर्‍या वर्षी बाहेर पडायचे असेल तर त्याला पदविका प्रमाणपत्र दिले जाईल, तिसर्‍या वर्षी पदवी प्रमाणपत्र दिले जाईल आणि चौथ्या वर्षी 'डिग्री विथ ऑनर्स' अशी पदवी दिली जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांनी तीन वर्षांची पदवी पूर्ण केली आहे, त्यांच्यासाठी पदव्युत्तर पदवीचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम राहणार आहे.

तर ज्यांनी चार वर्षांची डिग्री केली आहे त्यांच्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केवळ एक वर्षाचा असणार आहे. तर एक पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम असणार आहे. ज्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशी एकत्रित डिग्री मिळणार आहे. पदव्युत्तर पदवी करत असताना एखादा विद्यार्थी एकाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडला तर त्याला पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाची दोन भागात विभागणी करण्यात आलेली आहे. मुख्य विषय आणि काही उपमुख्य विषय असणार आहेत. त्यात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, व्यवसाय शिक्षण, कौशल्यशिक्षण, क्षेत्रभेट, इंटर्नशिप, भाषाशिक्षण आणि कौशल्य, मूल्य असलेले छोटे कोर्स, संशोधन प्रकल्प आदी नऊ भाग अभ्यासक्रमात असतील.

चार वर्षांचा अभ्यासक्रम आठ सत्रांत आणि 160 क्रेडिटमध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक सत्रासाठी 20 क्रेडिट देण्यात आले आहेत. विद्यार्थी केवळ पदवीधारक न घेता तो कौशल्यपूर्ण व्हावा आणि त्याला सर्व गोष्टींचे ज्ञान मिळावे, असा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. विद्यार्थी एखादा अभ्यासक्रम विविध विद्यापीठांमधून पूर्ण करू शकतो. त्यासाठी तो वर्ष संपल्यानंतर दुसर्‍या विद्यापीठात प्रवेश घेऊ शकतो. यासाठी अ‍ॅकॅडमिक क्रेडिट बँक तयार करण्यात येणार आहे. जेवढे सत्र विद्यार्थी पूर्ण करेल, त्यानुसार त्याचे क्रेडिट त्या बँकेत जमा केले जाणार आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे विविध पर्याय; धोरण लवचिक

चार वर्षांच्या पदवीचे स्वरूप
पहिले वर्ष – अंडर ग्रॅज्युएट प्रमाणपत्र
दुसरे वर्ष – अंडर ग्रॅज्युएट पदविका प्रमाणपत्र
तिसरे वर्ष – पदवी प्रमाणपत्र
चौथे वर्ष – डिग्री विथ ऑनर्स पदवी

नव्या प्रारूपात प्रामुख्याने नऊ घटकांचा समावेश आहे. पदवीचे मुख्य अणि संबंधित विषय, आंतरशाखा मुख्य अणि संबंधित विषय, व्यावसायिक विषय, भाषा अणि संवाद, मूल्य आधारित विषय, आंतरवासिता, पर्यावरण संबंधित विषय, वैश्विक नागरिकता विषय आणि संशोधन प्रकल्प, यामुळे विद्यार्थ्यांंना सर्वंकष ज्ञान मिळेल अणि त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल.
प्रा. डॉ. गणेश काकांडीकर,
प्राध्यापक तथा संकुल प्रमुख, यंत्र अभियांत्रिकी, एमआयटी

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे देशाच्या उच्च शिक्षणाचे स्वरूप बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. शिक्षण मंत्रालयाने केलेल्या या असाधारण प्रयत्नांचा लाभ आपण घेऊन आपल्या तरुणांना सतत बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे.
– डॉ. राजनीश कामत, अधिष्ठाता, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

SCROLL FOR NEXT