पुणे

पुणे : दोन लाख जणांना महिन्यात ‘बूस्टर’; ग्रामीण भागात प्रमाण अधिक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत पुणे जिल्ह्यात दक्षता (बूस्टर) डोस मोफत देण्यात आला. या महिनाभरात पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये दोन लाख अठरा हजार जणांनी दक्षता डोस घेतला आहे. 15 जुलैपासून पुण्यात कोरोना प्रतिबंधात्मक दक्षता डोस मोफत देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसांनंतर दक्षता डोस घेणार्‍यांमध्ये वाढ होत गेली. पहिला, दुसरा डोस घेणार्‍यांची संख्याही कमी होती. एका महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत बूस्टर डोस घेणार्‍याची संख्या पुन्हा वाढली. त्यामुळे पुणे शहरात एका महिन्यात एक लाख तीन हजार 311 जणांनी दक्षता डोसचा मोफत लाभ घेतला.

पिंपरी-चिंचवड शहराच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दक्षता डोस घेणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. 'जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 77 हजार 328 जणांनी डोस घेतल्याची माहिती समोर आली. पिंपरी-चिंचवडमध्ये 37 हजार 382 जणांनी मोफत दक्षता डोस घेतला. त्यामुळे एका महिन्यात दोन लाख 18 हजार 21 जणांनी मोफत दक्षता डोस घेतला,' अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, राज्यात एप्रिलनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ होऊ लागली. परिणामी, केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क दक्षता डोस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन महिन्यांनी 15 जुलैपासून राज्यासह देशात केंद्र सरकारने सर्वांना सरकारी रुग्णालयात मोफत दक्षता डोस देण्याचे जाहीर केले. त्यानुसार बूस्टर डोस घेण्यास नागरिकांची सुरुवातीच्या टप्प्यात गर्दी झाली. मोफत डोस मोहिमेला एक महिना पूर्ण झाला आहे, या महिनाभराची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

सप्टेंबर महिन्यापर्यंत ज्यांनी पहिला, दुसरा किंवा मोफत बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा. त्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. कोरोनाचा धोका कमी झाला आहे. मात्र, धोका टळला नसल्याने त्यापासून संरक्षण घेण्यासाठी डोस घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात लशींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

                                                   डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT