पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंदर मावळ येथील वाहणगाव आणि कुसवली गावांच्या मधोमध असलेल्या महादेवाच्या निमसदाहरित देवराईमध्ये हाबेनारिया स्टेनोपेटाला हे दुर्मीळ ऑर्किड आढळून आले आहे. धार्मिक आधारावर जंगलात संरक्षण केलेल्या देवराया ह्या औषधी वनस्पती, पिकांच्या जंगली जाती आणि दुर्मीळ वनस्पतींचे भांडार असतात. वनस्पती अभ्यासक प्रा. किशोर सस्ते आणि डॉ. राणी भगत यांना एक दुर्मीळ ऑर्किड आढळून आले आहे.
महाराष्ट्रातील फक्त ठाणे आणि कोयना अभयारण्यात नोंदविले गेले होते. या देवराईच्या घनदाट सावलीला हे ऑर्किड सापडले असून आंबा, कोकम फणशी, अंजन आणि पिसा या झाडांच्या सावलीत ते सापडले आहे. या ऑर्किडची संख्या केवळ 5 आहे. 2011 मध्ये कोयना अभयारण्यात या ऑर्किडची संख्या 6 होती आणि ते 40 वर्षांतून नोंदविले गेले होते.
डालझेल या ब्रि टिश अभ्यासकाने याची नोंद 18 व्या शतकात मुंबई-ठाणे येथे केली होती. हे ऑर्किड काश्मीर, आसाम आणि नेपाळसारख्या उंच प्रदेशात देखील आढळून येते. वातावरणानुसार याची फुले हिरव्या किंवा किरमीजी रंगाची असतात. फुले येण्याचा काळ ऑक्टोबर ते डिसेंबर असतो. पालापाचोळा आणि मातीच्या रंगाशी याची फुले नक्कल करतात म्हणून सहसा हे ऑर्किड
जवळून गेले तरी लक्षात येत नाही.