पुणे; पुढारी वृत्तसेवा: अतिशुद्ध मद्यार्काची चोरी करून बनावट दारू तयार करणार्या टोळीतील काही मद्यतस्करांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी छापा मारून ताब्यात घेतले. या टोळक्याकडून 30 लाख रूपये किमतीच्या अतिशुद्ध मद्यार्कासह एकूण सुमारे 54 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना खबर्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार चौफुला-शिरूर रस्त्यावर छापा मारून एका टँकरवर कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशमधून आलेल्या टँकरमधून काही लोक रबरी पाईपव्दारे मद्यासारखे वास येणारा द्रव पदार्थ टँकरमधून काढत होते.
त्यांना काही गावकर्यांनी विचारले असता, त्यांनाच धमक्या देऊन परतवून लावण्यात आले. ही माहिती खबर्याने अधीक्षकांना कळविली आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबर्याने दिलेल्या माहितीनुसार पारगावच्या हद्दीत राजस्थान हॉटेलच्या शेजारी असलेल्या जागेत एक सोळा चाकी ट्रँकर (क्रमांक- जी.जे.-12 बी.वाय. 8657) उभा असल्याचे दिसले. पथकातील काही अधिकार्यांनी स्पिरीट आम्हाला मिळेल का, असे बोलण्यात त्या चोरट्याला गुंगवले. बोलणी सुरू असतानाच पथकातील अधिकार्यांनी पाठीमागून येत त्या तस्करांना पकडले. या चोरट्यांकडून 200 लिटर क्षमतेचे 4 प्लॅस्टिक बॅरेल व 20 लिटर क्षमतेचे 24 प्लॅस्टिकचे जार जप्त करण्यात आले.
या कारवाईनंतर आरोपी सुंदरसिंग मेलासिंग याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले, की केरळ येथील मद्यनिर्मिती कारखान्यात हे स्पिरीट नेत होतो. नेहमीप्रमाणे बनावट मद्य निर्मिती करणार्या काही तस्करांनी माझ्याशी संपर्क साधून या टँकरमधून स्पिरीट देण्यास सांगितले. त्यानुसार मी चौफुला रस्त्यावरील मोकळ्या जागेत टँकर उभा करून स्पिरीट काढण्याचे काम करीत होतो. ही कारवाई भरारी पथक क्रमांक 2 ने केली.