पुणे; पुढारी वृत्तसेवा: ढोल-ताशा पथकांच्या तालावर थिरकणारे तरुण…गर्दीत 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करणारे लहानगे अन् मानाच्या प्रमुख गणपतींची मिरवणूक पाहण्यासाठी झालेली अलोट गर्दी…असे उत्साही वातावरण बुधवारी रंगले होते… दीर्घ प्रतीक्षेनंतर पुणेकरांना तोच पूर्वीचा उत्सवाचा आनंद अनुभवता आला. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्याने पुणेकरांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी अन् लहानग्यांनी आगमनाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. रस्तेच रस्ते गर्दी फुलून गेले होते. त्यांनी ढोल-ताशा पथकांचे वादन अनुभवलेच, तर बाप्पाच्या विलोभनीय मूर्तीची छायाचित्रेही टिपली. लक्ष्मी रस्ता, आप्पा बळवंत चौक, समाधान चौक, गणपती चौक आदी ठिकाणी गर्दीच गर्दी झाली होती…दोन वर्षानंतर का होईना मिरवणुकीचा तोच रंग अनुभवता येत असल्याने प्रत्येक जण भारावून गेला होता. लहानगे 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करीत होते, तर तरुणाई थिरकत होती…विर्सजनाला दिसणारे उत्साहपूर्ण वातावरण आगमनाच्या मिरवणुकीतही दिसून आले.
प्रत्येक क्षण प्रत्येकाने भरभरून जगला अन् प्रत्येकाच्या जोश आणि जल्लोषात कोणतीही कमतरता नव्हती. श्री कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती अन् त्यासोबत इतर मंडळांच्या मिरवणुकांनी लक्ष वेधले, पण हा सोहळा पाहण्यासाठी झालेल्या गर्दीनेही उत्सवाच्या आनंदात वेगळाच रंग भरला. पुण्यातील गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग असलेल्या आगमनाची मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने प्रत्येक जण आनंदोत्सवात न्हाऊन गेला.