पुणे; पुढारी वृत्तसेवा: सध्या तरुणाई पॉडकास्टकडे वळली असून, स्वत:च्या आवाजात वेगवेगळे विषय ऑडिओ रूपात रेकॉर्ड करून त्याला पॉडकास्टचे रूप येऊ लागले आहे. हे पॉडकास्ट विविध मोबाईल अॅपवर प्रसारित केले जातात. स्वत:च्या आवाजातील या ऑडिओच्या माध्यमातून तरुणाईला व्यक्त होण्याचे नवे साधन मिळाले आहे.
पॉडकास्टमुळे तरुणाईची 'हवा'
पॉडकास्टच्या माध्यमाने अनेक तरुणांना नवी ओळख दिली आहे. त्यांच्या पॉडकास्टवरील आवाजाने त्यांना फेमस केले आहे. पुण्यातही अनेक असे तरुण आहेत, जे हे माध्यम वापरून फेमस झाले असून, ट्रॅव्हल, फूड, मोटिव्हेशनल, ऐतिहासिक, क्रीडा, अभिनय, नाटक अशा विविध विषयांवरील पॉडकास्टला चांगला चाहता वर्ग आहे.
पॉडकास्ट कुठे उपलब्ध?
हे पॉडकास्ट विविध मोबाईल अॅपवर उपलब्ध असून, वेगवेगळ्या चॅनेलवर पॉडकास्ट ऐकायला मिळतील. सध्या अनेक संगीत कंपन्यांनी पॉडकास्टची सेवा उपलब्ध करून दिली आहे. गावाकडच्या गप्पा असोत वा मोटिव्हेशनल टॉक… तरुणाईच्या मनातील विविध कहाण्या असो वा ट्रॅव्हल, फुड… अशा विविध विषयांवर पॉडकास्ट तयार केले जात असून, त्याला मोठा श्रोता वर्गही आहे. यातून तरुणांचे अर्थार्जनही होत असून, पॉडकास्ट कंपन्यांकडून तरुणांना जाहिराती, प्रायोजकत्व आणि ब्राडिंगसाठी पैसेही दिले जातात.
पॉडकास्ट म्हणजे काय?
तंत्रज्ञानाच्या विश्वातील नवीन शब्द म्हणजे पॉडकास्ट. जसे रेडिओ, एफ.एम. आपण ऐकतो. ज्यामध्ये फक्त आवाज ऐकायला येतो, अगदी त्याचप्रकारे पॉडकास्टमध्येही ऑडिओ ऐकता येतो. आपल्याकडे असणार्या मोबाईलद्वारे पॉडकास्ट सुरू करता येते. जसे व्हिडिओ रेकॉर्ड करून यू-ट्यूब चॅनेल अथवा फेसबुकवर पोस्ट केले जातात, त्याचप्रकारे आपला आवाज रेकॉर्ड करून पॉडकास्ट बनवता येते, त्यानंतर ते सोशल मीडियावर प्रसारित केले जाते.
पॉडकास्ट कसे तयार करतात?
सोशल मीडियावर लेख किंवा ब्लॉगमध्ये शब्दांच्या आधारे माहिती मांडली जाते. व्हिडिओमध्येही चलचित्रांद्वारे माहिती देण्यात येते. त्याचप्रकारे पॉडकास्टमध्ये फक्त ऑडिओचा वापर करून माहिती दिली जाते. स्वत:च्या आवाजात एखादा विषय विशिष्ट शैलीत रेकॉर्ड करून त्याला बॅकग्राउंड
संगीत देऊन, त्यात संवादाची भर
घालत हे पॉडकास्ट विविध अॅपवर अपलोड केले जात आहेत. अॅपवर त्यासाठी स्वत:चे पॉडकास्टचे चॅनेल उघडले जाते. त्यावर पॉडकास्ट तयार करून ते अपलोड केले जातात. त्याची लिंक श्रोत्यांना पाठवली जाते आणि त्यावर क्लिक करून श्रोते पॉडकास्ट ऐकू शकतात.