पुणे

पुणे : तर पालिकेचे 42 प्रभाग; चार सदस्यीय 40, तीन सदस्यीय 2 अशी रचना असणार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास पुणे महापालिकेसाठी 42 प्रभाग तयार होणार आहेत. यामध्ये चार सदस्यीय 40 प्रभाग, तर तीन सदस्यांचे 2 अशा पद्धतीची ही रचना असणार आहे. राज्य शासनाने नुकताच 2011 च्या लोकसंख्येनुसार आणि 2017 च्या महापालिका निवडणुकीप्रमाणे सदस्य संख्या निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच बुधवारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका घेण्यासंबंधीचा कायदा करण्यासंबंधीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मुंबई वगळता राज्यातील उर्वरित सर्वच महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसार पुणे महापालिकेसाठी पुन्हा नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. पुणे महापालिकेत 2017 ला 11 गावे, तर 2021 ला 23, अशी एकूण 34 गावे समाविष्ट झाली. त्यामुळे 2017 प्रमाणे चार सदस्यांची रचना कायम ठेवता येणार नाही. त्यामुळे नव्याने रचना करावी लागणार आहे. दरम्यान, पुणे महापालिकेमध्ये 34 गावांच्या समावेशामुळे आता महापालिकेची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 35 लाख 56 हजार इतकी झाली आहे.

राज्य शासनाच्या नव्या निकषानुसार 30 लाख लोकसंख्येसाठी 161 आणि त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येस एक या सदस्य संख्येच्या नियमानुसार पुण्यातील नगरसेवकांची संख्या 166 इतकी होणार आहे. त्याची चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार 40 प्रभाग चार सदस्यांचे होतील आणि उर्वरित दोन प्रभाग तीन सदस्यांचे करावे लागतील, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.

या चार महापालिकांमध्ये नव्याने रचना
राज्य सरकारच्या निर्णयानुसार 2017 प्रमाणे पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय झाल्यास पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर आणि औरंगाबाद या चार शहरांमध्ये नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. यामध्ये पुणे आणि नवी मुंबई महापालिकेची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे समाविष्ट गावांसह रचना होईल, तर औरंगाबाद आणि कोल्हापूरमध्ये यापूर्वी एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना चार सदस्यीय प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT