पुणे

पुणे : तब्बल सव्वातीन लाख मतदारांचा प्रभाग बदलला

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीच्या छाननीमध्ये तब्बल सव्वा तीन लाख मतदारांचा प्रभाग बदलला आहे. प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकती-सूचनांनुसार झालेल्या कार्यवाहीमुळे हे बदल झाले असून, आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, प्रभागनिहाय मतदारांच्या नावांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे त्यातून समोर आले होते.

जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी पाच हजारांहून हरकती- सूचना नोंदविल्या होत्या. हरकती-सूचनांची तीव्र ता लक्षात घेऊन महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मतदार यादीसाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाने आधी दि. 16 जुलै व त्यानंतर पुन्हा 21 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली. या कालावधीत प्रशासनाने एक हजार अधिकारी, कर्मचार्‍यांची फौज मतदार याद्यांची तपासणीसाठी उतरवली होती. त्यात सर्व हरकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातरजमा करण्यात आली.

त्यानुसार एकूण मतदारांच्या जवळपास दहा टक्के म्हणजेच सव्वातीन लाख मतदारांच्या नावांची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे निवडणूक विभाग प्रमुख डॉ. यशवंत माने यांनी सांगितले. आयोगाच्या आदेशानुसार आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार, त्यानंतरच पुन्हा मतदारांच्या नावांवरून गोंधळ कायम राहिला आहे की दूर झाला आहे, यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

SCROLL FOR NEXT