पुणे

पुणे : ‘ड्रीम गर्ल’ने जिंकली रसिकांची मने

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: भगवान श्रीकृष्णाचा जन्म, श्रीकृष्णाच्या लहानपणातील बाल लीला, मय्या यशोदाची श्रीकृष्णावर असलेली माया, श्रीकृष्णाची विविध रुपे नृत्यनाटिकेतून हेमा मालिनी व सहकलाकारांनी सादर केली अन् रसिक भक्तिरसात न्हाऊन गेले. 34 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये शनिवारी (दि.3) ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि सहकलाकारांनी 'यशोदा कृष्ण बॅले' ही नृत्यनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कला केंद्राच्या वतीने या बॅलेची निर्मिती करण्यात आली असून, त्यातील 50 सहकलाकार नृत्यनाटिकेत सहभागी झाले. शब्द, सूर, ताल यांचा अनोखा संगम रसिकांनी अनुभवला.

रंगमंचावर क्षणाक्षणाला बदलणारा प्रसंग सादर करताना राखलेला ताल अप्रतिम होता. हेमा मालिनी यांची जादू आजही रसिकांच्या मनावर कोरलेली असल्याची अनुभूती या वेळी आली. नृत्यनाटिकेतील गाणी, त्याला साजेसे संगीत, कलाकारांचा अभिनय अन् नृत्य आणि त्यात हेमा मालिनी यांचे उत्कृष्ट सादरीकरण रसिकांच्या वाहवा मिळवून गेले. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि मीरा कलमाडी यांनी हेमा मालिनी यांचा सत्कार केला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, काँग्रेसचे नेते रमेश बागवे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, काँग्रेस नेते अभय छाजेड आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT