आळेफाटा (जि. पुणे); पुढारी वृत्तसेवा : साकोरी (ता. जुन्नर) येथील तलाठ्यास शिवीगाळ करून मारहाण झाल्याप्रकरणी एका जणाविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी साकोरी येथील तलाठी वैभव विठ्ठल गाढवे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, आरोपी अक्षय उर्फ बंटी महादु घनदाट (रा. साकोरी) यांनी रविवारी दुपारी साकोरी गावच्या हद्दीत फिर्यादी हे कर्तव्यावर हजर असताना आरोपी घनदाट याने करित असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून काहीएक कारण नसताना फिर्यादी यांचे अंगावर धावून येऊन फिर्यादी व त्यांचे बरोबर असलेले त्यांचे सहकारी गोरक वाघ यांना चापटा बुक्क्यांनी मारहान करून शिवीगाळी दमदाटी केली वगैरे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी आळेफाटा पोलिसात आरोपी अक्षय उर्फ बंटी महादु घनदाट यांच्या विरोधात भा.दं.वि कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.