पुणे

पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांवर पर्यटकांसाठी जमावबंदी; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यातील सिंहगडासह इतर गडकिल्ले, पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी रविवारपर्यंत (दि.17) जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संभाव्य धोकादायक ठिकाणी कलम 144 म्हणजेच जमावबंदी लावण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनासाठी आणि गिर्यारोहणासाठी आठ तालुक्यांतील किल्ले, लेणी आणि निसर्गरम्य ठिकाणच्या परिसरात गिर्यारोहणासाठी, पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहेत. गडकिल्ले, नैसर्गिक पर्यटन स्थळे येथे वाढत्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कात्रज तसेच आंबेगाव, मावळ, वेल्हे तालुक्यांतील घाट रस्त्यांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. बहुतांश पर्यटनस्थळांवरील पायवाटा निसरड्या झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून दरड कोसळण्याची शक्यता असणारे धोकादायक ठिकाणे पुढील चार दिवस बंद करून कलम 144 लागू करण्यात आले आहे.

वेगाने वाहणार्‍या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात जाणे किंवा पोहणे, धबधब्यावर जाणे किंवा प्रवाहाखाली बसणे याला बंदी आहे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दर्‍यांचे कठडे, धोकादायक वळणे येथे सेल्फी काढणे किंवा चित्रीकरणाला मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी मद्यपान, मद्यवाहतूक, मद्यविक्रीला पायबंद घालण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी वाहन थांबवता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टीम वाजवण्यालादेखील बंदी घालण्यात आली आहे. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई आहेे.

ही आहेत प्रतिबंधात्मक क्षेत्रे
तालुका                                  ठिकाण
हवेली                 सिंहगड, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक
मावळ                लोहगड, तिकोणा, विसापूर, तुंग किल्ले,ड्युक्सनोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरे खिंड, पवना परिसर
मावळ                राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला.
मुळशी               अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दीपदरा, कोराईगड
जुन्नर                  किल्ले जीवधन
वेल्हा                  तोरणा, राजगड किल्ले, पानशेत धरण परिसर, मढेघाट
भोर                    रायरेश्वर किल्ला
आंबेगाव              बलिवरे ते पदरवाडी, भीमाशंकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT