पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्त धान्य वेळेत मिळावे, यासाठी 441 नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू केली जाणार आहेत. 1 एप्रिलपासून प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र संस्था व बचत गटांकडून अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली.
ग्रामीण भागात 1 हजार 823 स्वस्त धान्य दुकानांतून धान्य वितरित केले जात आहे. परंतु, वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पायपीट करून धान्य मिळवावे लागते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार नवीन दुकान ज्या ठिकाणी सुरू करता येईल, ती ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. काही ठिकाणी दुकानांचे परवाने परत केले आहेत. तसेच लोकसंख्यावाढ झालेली अशी एकूण 363 नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू केली जाणार आहेत.
पुणे शहरात सध्या 719 दुकानांतून स्वस्त धान्य वितरित केले जाते. सध्या प्रतिक्विंटल धान्यविक्रीवर 150 रुपये कमिशन मिळते. त्यामुळे मिळणारे कमिशन आणि दुकानभाडे याचा ताळमेळ बसत नाही. परिणामी, दुकानदार परवाने परत करीत असल्याचे चित्र आहे. शहरात नव्याने 78 दुकाने सुरू केली जाणार आहेत.
स्वस्त धान्य दुकानासाठी कोण करू शकतो अर्ज?
ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणी झालेले म्हणजेच नोंदणीकृत स्वयंसाह्यता बचत गट, सहकारी संस्था; परंतु ज्या सहकारी संस्था महाराष्ट्र सहकार कायदा 1960 अंतर्गत नोंदणी झालेल्या आहेत तसेच नोंदणीकृत सार्वजनिक संस्था आणि सार्वजनिक न्यास यांना स्वस्त धान्य दुकान मिळविण्यासाठी अर्ज करता येतो.
रेशन दुकाना परवान्यासाठी अशी चालते प्रक्रिया
नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज केल्यानंतर परवाना समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक तपासणी केली जाते. त्यानंतर अर्जांची छाननी होते. परवानगी मिळविण्यासाठी जागा आवश्यक असते. जागा असल्याची खातरजमा केल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांना परवाना दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे
1) ग्रामसभेचा ठराव, दुकान मागणीपत्र
2) घर टॅक्स पावती/सातबारा/मालकीपत्र
3) गट स्थापन केल्याचे नोंदणीपत्र
4) गटाचे वार्षिक लेखे तपासणी केल्याचा अहवाल
5) आधार कार्ड
6) गुन्हा दाखल नसल्याबाबत शपथपत्र