पुणे

पुणे : चोरलेल्या गाडीने घेतला पादचार्‍याचा जीव; सराइतांसह दोघांना अटक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नगर रस्त्यावर सुमो गाडीमध्ये झोपलेल्या चालकाला मारहाण करून त्याची गाडी चोरली. त्यानंतर गाडी पळवून घेऊन जाताना वानवडी येथे एका पादचार्‍याला धडक दिली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 ने दोघांना ताब्यात घेतले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीची 4 वाहने जप्त केली. आरोपींकडून वाहने, जबरी चोरीचे विविध पोलिस ठाण्यांतील 7 गुन्हे उघडकीस आणले. रोहित रामप्रताप वर्मा (वय 22, रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वर्मा हा सराईत गुन्हेगार आहे.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2 हद्दीमध्ये गस्त घालत होते. कर्मचारी शिवाजी जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी वर्मा आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांना हडपसर येथून एका दुचाकी गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. साळुंखे विहार रोडवरील एका हॉटेलसमोर दुचाकीचालकास लिफ्ट मागण्याचा बहाणा करून हाताने मारहाण करीत त्याची दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार आरोपी वर्मा याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चार दिवसांपूर्वी पहाटे साडेचार वाजता नगर रस्त्यावरून सुमो गाडी चोरल्याचे कबूल केले.

गाडीत झोपलेल्या चालकाला दमदाटी करून गाडी पळवून नेली. गाडी घेऊन पळून नेताना वानवडीतील गणेशनगर भागात आल्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला आणि एका पादचार्‍याच्या अंगावर गाडी गेली. या वेळी वर्माचा अल्पवयीन साथीदार गाडी चालवत होता. अपघातात पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर वर्मा आणि त्याचा साथीदार दोघेही पसार झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीची चार दुचाकी वाहने जप्त केली असून कोंढवा, वानवडी, हडपसर, हिंजवडीसह विविध पोलिस ठाण्यांतील 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी राजेश अभंगे, विक्रांत सासवडकर, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, राहुल इंगळे यांनी ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT