पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यासह राज्यातील 3 हजार 943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन आंतरजिल्हा बदली करण्यात आली. 31 तासांत ऑनलाइन आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 55 शिक्षकांची इतर जिल्ह्यात बदली झाली.
या सर्व शिक्षकांचे सोमवारी (दि.22) बदलीचे आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
सर्वाधिक पालघर जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. तब्बल 478 शिक्षकांची बदली झाली आहे, तर सर्वांत कमी नागपूर येथील 11 शिक्षकांची अन्य जिल्ह्यांत बदली करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागामार्फत शिक्षकांची ऑनलाइन बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली. राज्य शासनाच्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे व सर्व नियमांचे पालन करून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली करण्यात आली आहे, तसेच मर्यादित जागा रिक्त बदलीचा आदेश जारी झाल्यानंतर त्या शिक्षकाला नवीन जिल्ह्यात रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करणे, प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर अवलंबून असेल.
शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असू शकत नाहीत, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अतिशय पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रियेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली होती. त्यानुसार ही बदलीची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून करण्यात आली. त्यामुळे कोणत्या शिक्षकांची कोणत्या जिल्ह्यात अन् कोणत्या शाळेत बदली झाली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज जिल्हा होणार जाहीर…
बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, त्याचे ठिकाण अद्याप उघड करण्यात आले नाही. सर्व माहिती संगणक प्रणालीत समाविष्ट आहे. ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दि. 22 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर शिक्षकांना ई-मेलमध्ये आदेश प्राप्त होईल आणि ती प्रणालीवरून डाउनलोड करू शकतील.