चाकण, पुढारी वृत्तसेवा : चाकण नगरपरिषद हद्दीत कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधित केले आहे. मात्र, तरीही प्लास्टिकचे उत्पादन करणार्या कारखान्यावर चाकण नगरपरिषद प्रशासनाने छापा मारून कारखान्याला सील केले आहे. सर्व साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाई केली. मालकावरही गुन्हाही दाखल केला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. त्यानुसार एकल वापर (सिंगल यूज) प्लास्टिक वस्तूंवर चाकण नगरपरिषदेने प्रतिबंध घातले आहेत. असे असतानाही चाकण पोलिस ठाण्याजवळ एका कारखान्यातून प्लास्टिकचे उत्पादन होत होते. गुरुवारी (दि. 14) चाकण नगरपरिषदेच्या प्लास्टिकमुक्त कारवाई पथकाने मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यावर छापा मारला.
विक्रीसाठी तयार असलेल्या 510 किलो 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या व कच्चा माल जप्त केला. कारखाना सीलबंद करून मालक सनी काकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पहिलाच गुन्हा असल्यामुळे त्यांना पाच हजार रुपये दंड केल्याचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी सांगितले. कारवाई राजेंद्र पांढरपट्टे, सूरज झेंडे, कविता पाटील, सूरज परदेशी, सुरेखा गोरे, मंगल गायकवाड यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात केली.