बेल्हे, पुढारी वृत्तसेवा : गुळूंचवाडी (ता. जुन्नर) या गावातील ग्रामदैवत मळगंगामाता मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीडीआर मंगळवारी (दि.2) चोरट्यांनी लंपास केले. आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार दिवसांत तीन चो-या झाल्या आहेत. परिणामी पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे.
कल्याण- अहमदनगर महामार्गालगत असलेल्या गुळूंचवाडी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात शनिवारी (दि.30) चोरी झाली होती. पुरातन कास धातूचा सुमारे 40 किलो वजनाचा घंटा चोरला होता. अद्यापही त्याचा सुगावा लागला नसतानाच मंगळवारी (दि.2) मळगंगामाता मंदिरातही चोरी झाली. चोरट्यांनी मळगंगामाता मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र दानपेटी जड असल्याने ते जमले नाही. मात्र, आपली चोरी उघडकीस येऊ नये, यासाठी मंदिर व महामार्गालगतचे सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांची हार्डडिस्कही चोरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पुजारी गोसावी, माजी सरपंच काशिनाथ गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
वाळुंजवाडी येथे रविवारी (दि.31) मुक्ताबाई देवीच्या मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकरसह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. केवळ चार दिवसांत तीन चो-यांनी आळेफाटा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.