पारगाव, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. मूर्ती तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मूर्तीच्या किमतींमध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली असल्याचे गावडेवाडीचे मूर्तिकार श्रीधर राजगुरू यांनी सांगितले.
सार्वजनिक गणेश मंडळे पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतच्या मूर्तींचे बुकिंग करीत आहेत. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस, काथ्या, रंग, विविध रंगीखडे यांच्या दरात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे. यामुळे मूर्तीच्या दरातही वाढ झाली आहे. मोठ्या मूर्ती खरेदी करणार्यावर गणेश मंडळांचा भर आहे. त्यामुळे मूर्तिकारदेखील मोठ्या मूर्ती तयार करण्याला प्रधान्य देत आहेत.
यंदाचा गणशोत्सव निर्बंधमुक्त वातारणात साजरा होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील गणेशमूर्ती तयार करण्याच्या कारखान्यातील कामाला वेग आल्याचे राजगुरू यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिक व गणेश मंडळांकडून उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे.
फेटाधारी, पगडीधारी, मयूरेश्वर वारकरी्, लंबोदर, अलंकार जडीत, हत्ती कर्ण, चंद्रावर विराजमान बालगणेश, श्रीकृष्ण रुपी महंतरूप यांसह विविध गणेशाच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बाप्पाच्या या मूर्ती भाविकांना आकर्षित करीत आहे. बहुतांशी भाविकांकडून वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींचे बुकिंग करण्यात आले आहे.
– मयूरी श्रीधर राजगुरू, मूर्तिकार गावडेवाडी