पुणे

पुणे : खरीप हंगामात सोयाबीनचा डंका; तब्बल 47 लाख हेक्टरवर पेरा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात खरीप हंगामातील पिकांखाली सरासरी 143 लाख हेक्टरइतके क्षेत्र असून, त्यापैकी 136 लाख हेक्टरवरील म्हणजे सरासरीच्या 95 टक्के क्षेत्रांवरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. खरिपातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख अधोरेखित झाली आहे. कारण सोयाबीनची तब्बल 47 लाख 41 हजार हेक्टरवर (114 टक्के) पेरणी पूर्ण करीत जुने विक्रम मोडीत काढले आहे.कृषी विभागाच्या 3 ऑगस्टअखेरच्या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे. सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र 41.43 लाख हेक्टरइतके आहे. गतवर्षी 43 लाख हेक्टरइतकी सोयाबीनची सर्वाधिक पेरणी पूर्ण झाली होती.

हा विक्रमही यंदा मोडीत निघून 47.41 लाख हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे भरीव उत्पादन अपेक्षित मानले जात आहे. कापसाच्या 99 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. राज्यात सोयाबीन पिकानंतर कापूस पिकाचे क्षेत्र दुसर्‍या स्थानी आहे. तब्बल 41.70 लाख हेक्टरवर कापसाचा पेरा पूर्ण झाला आहे. तर, सोयाबीन आणि कापूस पिकाखाली सुमारे 89 लाख हेक्टरइतके सर्वाधिक क्षेत्र आहे.

दमदार पावसामुळे भात लावण्यांना चांगलाच वेग आलेला आहे. त्यामुळे 82 टक्के म्हणजे सुमारे 12.51 लाख हेक्टरवरील भात लावण्या पूर्ण झालेल्या असून, येत्या आठवड्यात हा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज कृषी आयुक्तालयातून वर्तविण्यात आला. खरीप ज्वारी आणि बाजरीच्या पेरण्या तुलनेने कमी झालेल्या आहेत. तसेच, तूर आणि उडदाच्या पेरण्या तुलनेने चांगल्या असल्या, तरी मुगाच्या 67 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या पेरण्या हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे आहेत

पिके        सरासरी क्षेत्र       प्रत्यक्ष पेरलेले क्षेत्र    टक्केवारी
सोयाबीन   41,43,382          47,41,384            114
कापूस       42,11,293          41,70,809            99
भात          15,18,439          12,51,566             82
खरीप ज्वारी 3,16,551           1,44,457              46
बाजरी          6,75,105          3,91,141             58
मका          8,88,569          8,48,328                95
तूर            12,99,905        11,31,008                87
मूग             4,04,923         2,69,413                67
उडीद          3,79,423          3,47,130               91
भुईमूग          1,97,340         1,52,700               77

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT