पुणे

पुणे : केळवणेश्वरची पुरातत्वकडून दखल

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पाबेगाव येथील केळवणेश्वर या दुर्लक्षित देवस्थानाची पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी दखल घेतली असून, ते लवकरच या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. या देवस्थानच्या विकासासाठी योग्य ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

पाबेगावातील सोळाव्या शतकातील दुर्लक्षित देवस्थानाचे वृत्त सोमवारी (दि. 8) दै. 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी दखल घेतली आहे. लवकरच देवस्थानची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असे पुरातत्व विभागाचे राज्याचे सहसंचालक विलास वाहने यांनी सांगितले.

'पुढारी'चा पाठपुरावा

वर्गणीतून गावकरी उभारणार छोटेखानी मंदिर

पाबेगावातील डोंगर खोर्‍यांमध्ये असलेल्या या देवस्थानाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ते काही प्रमाणात का होईना, चांगल्या स्थितीत राहावे, याकरिता स्थानिक गावकरी वर्गणी काढून याठिकाणी छोटेखानी मंदिर उभारणार असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.

ग्रामपंचायत बसवणार सौर दिवे

केळवणेश्वर मंदिर हे अतिशय दुर्गम भागात आहे. याठिकाणी साधी लाईट तर सोडाच, जायला रस्तादेखील नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सौर दिवे बसविण्यात येणार आहे, असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT