पुणे

पुणे : केमसेवाडीतील खून अनैसर्गिक कृत्यातून

अमृता चौगुले

पौड, पुढारी वृत्तसेवा : केमसेवाडी (ता. मुळशी) येथे आढळलेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. दिनेश वर्मा असे त्याचे नाव असून, महेशकुमार सान्डे (वय 19, सध्या रा. केमसेवाडी, ता. मुळशी, मूळ गाव राजसेवैया खुर्द, पिथौरा, महासमुन्द छत्तीसगड) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अनैसर्गिक कृत्यामुळे त्याचा खून केल्याचे सान्डे याने सांगितले.

केमसेवाडी येथे अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या व्यक्तीचा खून करून त्याचे हात-पाय बांधून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेतात टाकून देण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस पाटील सोनाली केमसे यांनी पोलिसांना माहिती दिली होती. सदर खुनाचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी रिहे खोर्‍यात जाऊन माहिती घेतली असता, केमसेवाडी येथून एक इसम 12 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

दिनेश वर्मा असे त्याचे नाव असून, तो बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करीत असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार तपास केला असता, दिनेश वर्मा व महेशकुमार सान्डे हे एकत्र काम करीत होते. दिनेश वर्मा गेली 12 दिवसांपासून कामावर नव्हता. सान्डेकडे वर्माची चौकशी केली असता, त्याने वर्मा हा त्याचेसोबत वारंवार अनैसर्गिक कृत्य करीत असल्याने ठार मारल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सान्डेला अटक केली.

सदर गुन्हा पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पवन चौधरी, भालचंद्र शिंदे, विनायक देवकर, सहायक पोलिस निरीक्षक शेंडगे, पोलिस हवालदार नितीन रावते आदींनी ही कामगिरी केली.

SCROLL FOR NEXT