पुणे

पुणे : कुत्रा चावल्याने मालकिणीवर गुन्हा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कुत्र्याने महिलेचा चावा घेतल्याप्रकरणी मालकिणीविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा सिंग नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 जुलै रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास कुमारसियना मगरपट्टा रोड हडपसर येथील सोसायटीच्या लिफ्टमध्ये घडली आहे. कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे फिर्यादी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांनी तक्रार दिली आहे.

20 जुलै रोजी फिर्यादी महिला त्यांच्या सोसायटीच्या लिफ्टमधून खाली येत होत्या. त्यावेळी आरोपी महिलेच्या घरातील एक व्यक्ती लिफ्टमधून कुत्र्याला खाली घेऊन निघाली होती. या वेळी त्यांनी कुत्रा कोणाला चावू नये म्हणून कोणतीही दक्षता घेतली नाही. दरम्यान कुत्र्याने फिर्यादी महिलेच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या उजव्या हाताला चावा घेतला. अनेकदा तो कुत्रा सोसायटीच्या इतर लोकांच्या अंगावर धावून जाऊन चावला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

SCROLL FOR NEXT