पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज दूध) गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटरला एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खरेदी दर 32 वरून 33 रुपये करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी 11 ऑगस्टपासून करणार असल्याची माहिती कात्रज दूध संघाच्या चेअरमन केशरताई पवार यांनी दिली. राज्यात खासगी डेअर्यांकडून गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाची खरेदी 33 ते 34 रुपये दराने होत आहे. आता कात्रज संघानेही एक रुपयाने दूध खरेदी दर वाढविल्याने सर्व दुग्ध उद्योगाच्या बरोबरीने दूध खरेदी दर होत आहेत.
याबाबत पवार म्हणाल्या, पावसाळ्यात ताक, दही, आईस्क्रिम आदींना ग्राहकांकडून मागणी घटली होती. त्यामुळे कात्रज संघाकडे गरजेपेक्षा अधिक दुधाची आवक होत होती. संघाच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये शेतकर्यांना वाजवी भाव देण्यासाठी गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटरला एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध पावडरचा प्रतिकिलोचा दर आता 275 रुपयांवर स्थिरावला आहे, तर श्रावण महिन्यामुळे मागणी वाढल्यामुळे बटरच्या दरात किलामागे पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. बटरचा किलोचा भाव 375 वरून 390 रुपये झालेला आहे. सणासुदीमुळे आणि उपवासामुळे बटरचा खप नेहमीच्या तुलनेत वाढल्याने सध्याचे वाढीव दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
– मनोज तुपे, चेअरमन, रियल डेअरी.