पुणे

पुणे : कांद्याची आवक कमी, तरीही दर गडगडलेलेच

अमृता चौगुले

चाकण, पुढारी वृत्तसेवा : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घट झालेली आहे. कांद्याची आवक कमी असतानाही दरात फारशी सुधारणा झालेली नसल्याचे अडते आणि शेतकरी सांगत आहेत. घाऊक बाजारात कांदा 8 ते 14 रुपये किलो आहे.
कांद्याचे दर हे सप्टेंबर महिन्यापर्यंत स्थिर राहतील. त्यानंतर जुना कांदा संपुष्टात आल्यानंतर दर वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. चाकण बाजारात शनिवार आणि बुधवार या आठवडे बाजाराच्या दिवशी 2 ते 3 हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे.

बटाट्याचे भावही स्थिर असून, 18 ते 22 रुपये किलो दर आहे. बाजारात बटाट्याच्या 8 ते 10 गाड्यांची आवक होत आहे. सद्यस्थितीत गुजरात, आग्रा व उत्तर प्रदेशातून बटाटा मोठ्या प्रमाणात येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. चाकण मार्केटमध्ये बुधवारी (दि.27 ) कांद्याची 1 हजार 200 क्विंटल आवक होऊन कांद्याला 800 ते 1400 एवढा भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून
सांगण्यात आले.

स्वतंत्र कांदा धोरण हवेच

केंद्र सरकारने जागतिक पातळीवर भारतीय कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याची नियमित बाजारपेठ मिळवून द्यावी, तसेच देशांतर्गत कांद्याचे कमीत कमी दर निश्चित करून द्यावेत, जेणेकरून शेतकर्‍यांना शाश्वत नफा होईल, असे खेड तालुक्यातील कांदा उत्पादक आणि व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने देशाचे स्वतंत्र कांदा धोरण ठरवावे, याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकारला सूचना कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीमध्ये राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे अडते असो.चे अध्यक्ष जमीर काझी, बाजार समितीचे संचालक राम गोरे, भरत गोरे, प्रशांत गोरे, बाळासाहेब गायकवाड आदी कांदा उत्पादक शेतकरी, अडते आणि व्यापार्‍यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT