पुणे

पुणे : कंटेनर-स्विफ्ट अपघातात एक ठार

अमृता चौगुले

भिगवण, पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळील भादलवाडी हद्दीत असणार्‍या बिल्ट पेपर कंपनीजवळ कंटेनर व स्विफ्ट कारमध्ये झालेल्या अपघातात सोलापूर येथील महसूल विभागातील अव्वल कारकून उमेश श्रीकृष्ण वैद्य (वय 47) हे ठार झाले, तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भादलवाडी हद्दीत घडला आहे.

प्रफुल्ल रमेश क्षीरसागर (वय 29, रा. अहिल्यानगर विजापूर रोड, सोलापूर) व राजकुमार श्रीपती वाघमारे (वय 66) हे दोघेजण जखमी झाले आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर (एमएच 04 जेके 4405) हा पुण्याकडून सोलापूरकडे निघाला होता. संबंधीत अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील कंटेनर हा दुभाजकामधून सोलापूरकडे वळवला; मात्र त्याने इंडिकेटर अथवा हातवारे करणे गरजेचे असताना तसे केले नाही.

अतिशय वेगाने या चालकाने कंटेनर रस्त्यावर घेतला. या वेळी सोलापूरकडून येणारी स्विफ्ट (एमएच 13 बीक्यू 0097) कंटेनरला धडकली व अपघात झाला. यावरून भिगवण पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध व रस्त्यांच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याप्रकरणी तसेच फिर्याद न देता पळून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेल्याने त्याचे नाव व पत्ता समजू शकला नाही. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वारगड या घटनेचा तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT