पुणे

पुणे : औरंगाबादच्या मोसंबीचा आंबेबहार बहरला

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आंबट-गोड रसाळ मोसंबीचा आंबेबहार सुरू झाला असून, फळबाजारात औरंगाबाद परिसरातील मोसंबी दिसू लागल्या आहेत. यंदा मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने बाजारात दर्जेदार फळे दाखल होत आहेत. बाजारात मोसंबीला मागणीही चांगली असून, किरकोळ बाजारात 100 ते 140 रुपये किलो दराने विक्री होत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात औरंगाबाद येथून दररोज 20 ते 30 टन इतकी आवक होत आहे. घाऊक बाजारात तीन डझनास 120 ते 300 व चार डझनास 40 ते 100 रुपये भाव मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

त्यामुळे, एरवीच्या तुलनेत 15 ते 20 दिवस अगोदर हंगाम सुरू झाला आहे. फळांच्या दर्जात मोठी सुधारणा झाली असून, दर्जेदार फळे बाजारात दाखल होत आहेत. बाजारात दाखल होत असलेल्या फळांना मागणीही चांगली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंबेबहारातील मोसंबीची आवक वाढणार असून, हंगामातील पहिल्या टप्प्यात मोसंबीची चव आंबट-गोड राहणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मोसंबीचा गोडवा आणखी वाढेल.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंबेबहारातील मोसंबीची प्रतवारी चांगली राहणार आहे, तसेच मोसंबीचे दरही कमी राहतील.- सोनू ढमढेरे, मोसंबीचे अडतदार आंबे, मृग अन् अडकन बहार संपूर्ण देशभरात मोसंबीची सर्वाधिक लागवड नगर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर होते. जुलै महिन्यात सुरू झालेल्या आंबेबहरातील मोसंबीचा हंगाम फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहतो, त्याला जुना बहार असेही म्हटले जाते. त्यानंतर फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत मोसंबीचा मृगबहार सुरू असतो. जून ते जुलैदरम्यान मधोमध आवक होणारी मोसंबी अडकन बहारातील असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT