पुणे

पुणे : ओतूरला काठोकाठ भरून ओसंडतेय विहीर

अमृता चौगुले

ओतूर, पुढारी वृत्तसेवा : निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी वेळेत पाऊस पडणे, ही दुरापास्त गोष्ट आहे. मात्र, यंदा पुणे जिल्ह्यात दमदार बरसलेल्या पावसाने कमाल केली आहे. ओतूरमधील एक विहीर काठोकाठ भरून ओसंडून वाहत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्यानंतरही या विहिरीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे. सुमारे 60 फूट खोल व 22 फूट रुंद व्यासाची असलेली विहीर पूर्ण क्षमतेने पाण्याने भरून ओसंडून वाहताना पहिल्यांदाच निदर्शनास येत आहे.

ओतूर (ता. जुन्नर) येथील नगर- कल्याण महामार्गालगत असलेल्या कोळमाथा येथे ही सुमारे 60 फूट खोल व 22 फूट रुंद व्यासाची विहीर आहे. यंदाच्या पावसाळ्यात ती पूर्ण काठोकाठ भरलेली आहे. पाऊस ओसरून काही दिवस उलटलेले असताना अद्यापही ती ओसंडून वाहत आहे. अणे- माळशेज पट्ट्यात यंदा तुलनेने पावसाचे प्रमाण अधिक आहे. काही शेतांमध्ये अद्यापही पाणी साठून राहिलेले आहे. ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणेदेखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

ओतूर परिसरात असंख्य विहिरी असून बहुतांश विहिरी या 70 ते 100 फूट खोल आहेत. मात्र, कोळमाथा येथील पाण्याने भरून ओसंडून वाहत असलेली ही विहीर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

SCROLL FOR NEXT