ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ओतूर आणि परिसरात अल्प पावसावर भरवसा ठेवून पेरणीच्या कामांना वेग आला आहे. ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर, मांदारने, खामुंडी, डुंबरवाडी, डिंगोरे, धोलवड, हिवरे, पानसरेवाडी, अहिनवेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांत अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने बळीराजा शेतीकामात गुंतला आहे. चोहीकडे पेरणीची लगबग दिसून येते. असे असले तरी अत्यल्प पावसाने सर्वत्र दुबार पेरणीचे संकट कायम ठाकले आहे.
या वर्षी रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, अहिनवेवाडी परिसरात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला आहे. शेतकर्यांचा सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद पिकाकडे जास्तीचा कल दिसून येतो. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस येणे गरजेचे होते. मात्र, यंदाचा पाऊस जूनच्या शेवटी आल्याने व तोदेखील अल्पप्रमाणात आल्याने सोयाबीन, भुईमूग, मूग पेरणीला उशीर झाला आहे. त्यामुळे उडीद, भुईमूग, सोयाबीन, बाजरी पेरणीस कमालीचा वेग आला आहे.
या भागात अद्यापही पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने नदी-नाल्यांना पाणी वाहिले नाही. पेरणी झालेल्या पिकांवर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना? जमिनीत ओल किती प्रमाणात पडेल? असे अनेक प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहेत. पावसाचा अंदाजच येत नसल्याने शेतकरीराजा पुरता संभ्रमात आहे.
बियाणे खरेदी करताना शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर विश्वास ठेवून बियाणे खरेदी करीत असतो. त्यामुळे दुकानदारांनी शेतकर्यांना बियाणे देताना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तसेच योग्य बियाणे खरेदी करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे. बियाण्यांच्या भरवशावर चांगल्या दर्जेदार पिकाची वाट शेतकरी पाहत असतो. बियाणे खराब निघाले, तर संपूर्ण पीक वाया जाते व परिणामी नंतरची दोन-तीन वर्षे शेतकरी कर्जबाजारी होऊन आर्थिक डबघाईस येत असतो.
– सुरेश तुकाराम हिंगणे, प्रयोगशील शेतकरी, रोहकडी