पुणे

पुणे : ‘ऑफरोड वारी’त चित्तथरारक प्रात्यक्षिके

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा : गडदरवाडी (ता. बारामती) येथे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑफरोड वारी या चित्तथरारक स्पर्धेला उच्चांकी गर्दी झाली होती. रविवारी (दि.24) सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागात प्रथमच ही 'ऑफरोड वारी'पाहण्यासाठी तरुणांनी उच्चांकी गर्दी केली होती.

स्पर्धेतील हृदयाचा ठोका चुकवणारे स्टंट पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. दिवसभरात हजारो प्रेक्षकांनी या खेळाचा आनंद लुटत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. विविध गटातील स्पर्धकांना यावेळी रोख बक्षीस आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

स्पर्धेत चारचाकी वाहनांसह 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिला रेसिंग खेळाडूंचा सहभागही होता. स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, गुलबर्गा आदी ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते. अभिजित काकडे युवा मंचच्या या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये तीन ट्रॅक बनविण्यात आले होते. ट्रॅकची आखणी अभिजित काकडे आणि अभिजित धुमाळ सांगली यांनी केली होती. बारामतीसह पुरंदर, फलटण, खंडाळा आदी भागांतील नागरिकांनी हा साहसी खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. स्पर्धांमध्ये उद्योजक शिवाजी मोहिते, अमित फरांदे, अशोक घोरपडे, नटराज तुपे यांच्यासह अन्य खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT